Saturday, April 8, 2017

भेट (9 Apr, 2016)


आपण चाललो असे
रिकामटेकडे, बंद दुकाने
राजवाडे सजून उभे,
सांजवेळचे सवतसुभे,
पायांखाली लाल रकाने.


रकाने भरले पावलांनी
तिरपे सोनेरी किरण रुतले
गळ्यात गळे घातले सावळ्यानी,
पर्यटक तुझ्यातला टिपे चित्रे---
तिरकी मान, बारीक डोळे, ओठ मुडपले.


संवादाचे धागे उलगडले,
चालता चालता सोडत
गेलो एक धागा
परत जाण्यासाठी
पाण्यातून श्वासाला परत येण्यासाठी.
 
चकाकत्या पाण्यात परावर्तले
घरचेच काळजीचे सूर,
"मी ठीक आहे, बाबा"
(तुमच्या पासून दूर
पण माझ्या जिवाची हुजूर)

नजरेसमोर माझ्या पोर नाचे
पैंजण नव्हे आतडे जिवाचे
तिने घ्यावी गिरकी आणि
माथे चकरावे माझे,
हसता चमके कडे दातांचे.

"बाबांचे असे का कापावे हात,
का दगडांचे व्हावे मेण ?"
आठवणींची पिंपळ पाने
मी, तू बोटे फिरवावी
त्यांच्या धाग्या-धाग्यातून.

जुन्या सखीची याद यावी
ओठांचे चंबू, कानांची सुपे
घडी घातलेले हात
आणि नजरचोरीची रूपे
जरा श्वासालागी थांबू येथे. 

ऊबदार बैठक रस्त्यालागी
अंतरीचे संवाद, मिटणारी अंतरे
उबळीचे अंतर्नाद घुमणारे
काटे चमचे रुतणारे
बंद चूल, कोणी जेवणास मागी.

पुन्हा वळवावे घड्याळाचे काटे
बसून भरावे श्वासांचे भाते
या अंधाराचे किनारे
बंद आवाजांचे गाभारे
मनसोक्त बोलावे येथे.

Snooker च्या टेबलाचा काठ
भोवती गर्दीचा गोंगाट
तू सांगावेसे तुझे कुठे
गुंतले मन, रुतले काटे,
"मुलींनीच का नाचावे लग्नात?"

कुणी घडवले कुठल्या कुशीत,
प्रेमाचा एक चिवट धागा
म्हंटली तर एक श्रुंखला
तू उडावेस आकाशीच, जर
वाटले तर विसावे माझ्या कुशीत.


हरवले आता पावलांचे ठसे
गावाचे त्या कुसे झाले थिटे,
पंखांच्या बळावरती
गगन चुंबती तुझे स्वप्न
झोपेत कधी मला भेटे. 

रात्रीची धाव अशी
धापा टाकत उभी गाडी,
निरोपाचे शब्द गिळावे,
गळ्यात गळे घालून वळावे,
या सखीचे हृदय कळावे.